साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
होळ विविध कार्यकारी सेवा सहकारी (सायखवाडी) संस्था या संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत सौरऊर्जेचा वापर सुरू केला असून, संपूर्ण सौरऊर्जा वापरणारी जिल्ह्यातील पहिली सहकारी संस्था ठरली आहे. या नव्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनाचा समारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. संजीवराजे नाईक निंबाळकर हस्ते उत्साहात पार पडला.
या वेळी बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“होळ विकास सोसायटी ही सौर ऊर्जा वापरणारी जिल्ह्यातील पहिली सहकारी संस्था आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे संस्थेचा विजेवरील खर्च कमी होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्याचा आदर्श इतर संस्थांसाठी या संस्थेने घालून दिला आहे.फलटण तालुक्यात ज्या काही शंभर वर्षे जुन्या सहकारी संस्था आहेत, त्यामध्ये होळ विकास सोसायटीचा मानाचा समावेश आहे. ही संस्था आजही नफ्यामध्ये चालत असून, पारदर्शक व लोकाभिमुख कार्यपद्धती ठेवत आहे.
सहकार म्हटले की राजकारण आलं, हे आपण नुकत्याच झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहिलं. मात्र, होळ विकास सोसायटीने राजकारणापेक्षा लोकसेवेचा व गावविकासाचा मार्ग निवडला आहे.”
सोसायटीचे चेअरमन सुधीर भोसले म्हणाले,होळ विकास सोसायटीला शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास असून संस्थेने स्वतःची जागेत भव्यदिव्य इमारत उभी करून त्याच्यावरती हा 17 के व्ही क्षमतेचा सौर प्रकल्प उभा केला असून यातून संस्थेच्या विजेची पूर्ण गरज भागवली जाणार आहे संस्थेची एक एकर जागा सुद्धा शिल्लक असून या ठिकाणीही भविष्यात संस्थेच्या माध्यमातून संस्थेला आर्थिक नफा मिळवून देईल या दृष्टीने सर्व संचालकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी विकास काम केले जाणार आहे कार्यक्रमासाठी पं. स. माजी सभापती शंकरराव माडकर, नितीन शाहुराजे भोसले,व्हा चेअरमन राजाराम शिंदे, व सर्व संचालक मंडळ,संजय भोसले, अभयसिंहराजे नाईक निंबाळकर,विनोद जाधव व साखरवाडी पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,जिल्हा बँकेचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, राजे गटाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ सभासद बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी आभार सतीश झाडगे यांनी मानले